Wednesday, June 14, 2006

मी हे आयुष्य का जगतोय....?

मी.....एक २६ वर्षांचा तरुण.....ज्याला सारखा एकच प्रश्न सतावतोय......मी हे आयुष्य का जगतोय....?
म्हणुनच, आज का कुणास ठाउक, पण माझ्या आयुष्य़ातील 'तो' कप्पा share करावासा वाटतोय......
अगदी कालपरवापर्यंत मी एक confused bisexual होतो. मी समलिंगी का....आणि कसा झालो, हे मला कळलेच नाही. १४ वर्षांचा असताना माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठ्या असलेल्या आमच्या शेजारच्या मुलाने 'उगाच' 'काहीतरी विचित्र' केले काय आणि मी 'हया' सगळ्यात गुरफटत गेलो काय....काही कळलेच नाही. 'त्या' घटनेनंतर माझे एक 'दुसरे' आयुष्य सुरु झाले ज्यात अनाहुतपणे 'काहीतरी नवीन' शोधण्याचा जणुकाही एक छंद्च जडला...
हे सगळे सुरु असताना, माझे 'नॉर्मल' आयुष्य व्यवस्थित चालु होते ज्यात मी एक शहाणा, साधा सरळ, अभ्यासात आणि इतर बऱ्याच गोष्टींत पुढे असलेला, माझ्या आई-बाबांना ज्याचा अभिमान होता (अजुनही आहे) असा एक मुलगा होतो. कालांतराने मी संगणक अभियांञिक झालो, एका चांगल्या MNC कंपनीत लठ्ठ पगाराच्या नोकरीवर रुजु झालो. ह्या job च्या निमिताने बऱ्याचशा देशांची यात्रा घडली. आणि माझ्या 'दुसऱ्या' आयुष्यात...? फक्त 'तात्पुरती मजा' करणे ह्याशिवाय काहीच घडत नव्हतं. नाही...मला नाही वाटत, की मी माझ्या 'दुसऱ्या' आयुष्यात काही तरी घडण्याची वाट पहात होतो. पण एक मात्र नक्की....माझ्या 'नॉर्मल' आयुष्यात, मी भलेही Professionally Successful होतो (आहे), पण तरिही मला काहितरी कमी आहे असं सतत जाणवत रहायचं. आणि ह्याच पोकळीबद्द्ल बाऊ करता करता मी एका मुलीच्या प्रेमात कधी पडलो ते कळलेच नाही.....आमचा सहवास वाढत गेला.....चांगली मैत्री झाली.......मला एक अंधुकशी आशा वाटु लागली की हो..आता त्या 'दुसऱ्या' आयुष्यापासुन सुटका होऊ शकते....पण, हे सगळे सुरु असताना, असेही नव्ह्ते की मी कुणा मुलाला 'मजे'साठी भेटत नव्हतो.....'ते' सगळ चालुच होतं, फक्त त्याची तीव्रता....त्याचं प्रमाण कमी झालं होतं इतकच...
मी तिला propose करण्यासाठी योग्य संधीच्या शोधात होतो.....आणि तो दिवस आला...मी तिला propose केलं. ती थोडी आश्चर्यचकीत झाली. पण नंतर थोडीशी सावरल्यावर तिने मला एक routine से उत्तर (मी तुला फक्त एक चांगला मित्र मानते) देऊन नकार दिला. झालं..! सगळ्या स्व्प्नांचा चुराडा झाला......मी पुन्हा 'त्या' आयुष्यात 'फेकला' गेलो...
मला माझ्या आयुष्यातील पोकळी जास्तच जाणवायला लागली. त्यात भर म्हणुन आई-बाबांचं लग्नासाठी आलेली स्थळं shortlist कर म्हणुन टुणटुणं सुरुच होतं. शेवटी त्यांच्या जोराला बळी पडुन आणि माझ्या आयुष्यात काहीच होत नसल्याची बोच ह्याच्या परिणामाने मी 'कांदा पोहे' कार्यक्रमाला सुरुवात केली. बरेचसे असे कार्यक्रम झाल्यानंतर, आम्हा सर्वांना एक मुलगी पसंत पडली. माझी पसंती.....माहीत नाही....मी फक्त काळाच्या प्रवाहाबरोबर पुढे जात होतो...मनात एक आशा होती की सगळे काही व्यवथित होईल. जसजशी साखरपुड्याची तारीख जवळ येऊ लागली तसतशी मनात एक अनामिक भीति सतावु लागली. मी हे ठीक करतोय का? लग्नानंतर मला 'दुसऱ्या' आयुष्याशिवाय रहावेल का? मी माझ्या भावी पत्नीला शारिरीक सुख देताना कमी तर पडणार नाही ना? ह्या असल्या प्रश्नांचा कल्लोळ माझ्या डोक्यात रात्रंदिवस सुरु होता. दरम्यान, माझी आणि तिची engagement च्या आधीची फोनाफोनी सुरु होती. पण, मला सतत काहीतरी बोचत होतं. कदाचित मी माझ्या ex ला तिच्यात शोधायचो प्रयत्न करत होतो.....
...आणि बऱ्याच विचाराअंती मला शेवटी जाणवलं की मी हे लग्न नाही करु शकत. आजतागायत मी कधी कोणाला धोका दिला नाही की कोणाचं कधी वाईट केलं नाही, मग आता मी एक निरागस मुलीला कसं काय फसवु शकतो...? अर्थात, आज बरेचसे असे पुरुष आहेत जे अशा तऱ्हेचे dual life जगताहेत. भलेही ते त्यांच्या संसारात वरवरुन कितीही आनंदी असले तरी मला ठाऊक आहे....ते त्या 'दुसऱ्या' आयुष्याचा मनसोक्तपणे भोग घेणं miss करत असतील....त्यांना अपराधीपणाची भावना सतत बोचत असेल....चोरुन चोरुन....बायकोशी खोटं बोलुन 'त्या' आयुष्यात जेव्हा chance मिळेल तेव्हा जाण्याबद्द्ल त्यांना स्वतःचाच तिटकारा येत असेल....मला ह्या सगळ्यांतुन नाही जायचं होतं.....म्हणुनच मी केवळ 'wavelength' जुळत नाही अशी सबब सांगुन engagement पासुन स्वतःची सुटका करुन घेतली. आई-बाबांचा, सगळ्या नातेवाईकांचा रोष ऒढवुन घेतला.
ह्या घटनेनंतर, आयुष्यात मला प्रथमच मला देवाकडे 'तु मला असं का बनवलंस?' असं ओरडुन जाब विचारावासा वाटला. सुदैवाने मी नोकरी निमित्ताने दुसऱ्या शहरात असल्यामुळे, मला माझ्या घरच्यांचे.....नातेवाईकांचे सुतकी चेहरे पहावे लागले नाहीत....कुठेतरी मनात सारखं असं वाटत होतं की माझं आयुष्य चारचौघांसारखं नॉर्मल का नाही...पण मला तेव्हा हे कुठे माहीत होतं की माझ्या आयुष्यात एक प्रचंड मोठं वादळ येणार आहे ज्यात मी पुरता कोलमडुन पडणार आहे...... (क्रमःश)